गणपतीपुळे चौकातील पिकअप शेडचे छप्पर उडाले
ठाकरे शिवसैनिक आक्रमक ; अन्यथा पर्यटकांना धोका पोचेल
गणपतीपुळे, ः तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील मोरया चौकातील पिकअपशेडचे छप्पर वेगवान वाऱ्यामुळे उडाले आहेत. छपराचे अन्य पत्रे गंजलेले असून ते खाली पडण्याची शक्यता आहे. ही पिकअप शेड गेल्या काही वर्षांपासून विना वापर आहे. उडालेले पत्रे लोंबकळत तिथेच असून ते वेळीच बाजूला काढा, अन्यथा पर्यटकांसाठी धोका पोचू शकतो. अन्यथा आम्हाला पिकअपशेड जमीनदोस्त करावी लागेल, असा इशारा उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे, माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, उमेश भणसारी यांनी दिला आहे.
बाराव्या वित्त आयोगातून पिकअपशेड उभारणी करण्यात आली होती. गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाच्या (एमटीडीसी) मुख्य प्रवेशद्वारासमोर एसटी महामंडळाचा प्रवासी थांबा (पिकअपशेड) आहे. तेथे पर्यटकांना उभे राहता यावे यासाठी ती बांधण्यात आली होती. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात एसटी महामंडळाच्या गाड्यांनी येणाऱ्या भक्त व पर्यटकांना गणपती मंदिराजवळ उतरता यावे, या दृष्टीने ही पिकअप शेड बांधण्यात आली होती. परंतु आजतागायत ती पिकअप शेड वापरात आलेली नाही. या पिकअप शेडची दुरावस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसात वेगवान वाऱ्यामुळे पूर्णतः छप्पर उडाले आहे. गंजून सडलेले पत्रे खाली पडले आहेत. शिल्लक पत्रे भविष्यात पूर्णपणे खाली पडण्याची शक्यता आहे. गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मोरया चौकात ही पिकअपशेड असल्याने अनेक भक्त व पर्यटकांना धोका पोहचू शकतो. एमटीडीसी व स्थानिक प्रशासनाकडून या पिकअपशेडच्या दुरावस्थेकडे लक्ष दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही पिकअपशेड काढून तिथे अन्य सुविधा उपलब्ध करून देता येईल. मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. सध्या या पिकअपशेडच्या मागील बाजूस भक्त पर्यटकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था असल्याने अनेक गाड्या या ठिकाणी व पिकअपशेडच्या समोरच लावल्या जातात. पिकअपशेडच्या समोरच स्थानिक रिक्षा व्यावसायिकांचे रिक्षा स्टॅन्ड आहे. या रिक्षाचालक व्यावसायिकांकडून पिकअपशेडचा वापर बसण्यासाठी केला जातो. अनेक पर्यटक ही विश्रांतीसाठी पिकअपशेडमध्ये बसलेले दिसून येतात.