रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक दुपारनंतर पूर्ववत
रत्नागिरी:- सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथे रस्ता खचला आहे. गुरुवारी मध्यरात्री मातीचा भरावात ट्रकही अडकल्याने वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. शुक्रवार दुपारनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
रत्नागिरी-कोल्हापूर या महामार्गाचेही रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने नाणीज येथील हा भराव खचला. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेबारा वाजल्यापासून रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र अजूनही वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येत आहे.
सध्या या मार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. फक्त छोट्या गाड्यांची ये-जा सुरू आहे. पावसामुळे राज्य महामार्ग क्रमांक 166 पाली ते साखरपा गाव दरम्यान नाणीज येथील माध्यमीक शाळेसमोरील रस्ता खचलेला आहे, त्यामुळे सदरचा राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आला होता.
यावेळी पर्यायी मार्ग म्हणून मुंबई कडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा-दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली होती. कोल्हापूर कडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा-लांजा-मार्गाने वळविण्यात आलेली होती. शुक्रवार दुपारनंतर महामार्ग क्रमांक 166 वरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.