
बंदुकीची गोळी लागून शिकाऱ्याचाच मृत्यू, 20 मिनिटांचा थरार रेकॉर्ड
राजापूर : मोटारसायकलवरून शिकारीसाठी फिरताना बंदुकीची गोळी लागून खारेपाटण येथील एकाचा मृत्यू झाला. नितीन सुभाष चव्हाण (वय ४२, रा. कर्लेवाडी, खारेपाटण) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल पहाटेच्या सुमारास राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी जंगलमय भागातील होजवाडी रस्त्यावर घडली.
या प्रकरणी येथील पोलिसांत आकस्मिक मृत्यू दाखल करून राजापूर पोलिसांकडे अधिक तपास वर्ग केला आहे. एकट्याने शिकारीसाठी जंगलमय भागात फिरण्याचा छंद जिवावर बेतला. याबाबत मृताचे चुलत भाऊ महादेव भीमराव चव्हाण (४२, रा. रामेश्वरनगर, खारेपाटण) यांनी येथील पोलिसांत ही माहिती दिली.
मृत नितीन चव्हाण हे ट्रॅक्टर, डंपर चालक आणि मालक आहेत. ठेकेदारी व्यवसायात ते कार्यरत होते. काल मध्यरात्री एकच्या सुमारास ते खारेपाटण येथील घरातून मोटारसायकल घेऊन विनापरवाना काडतुसची बंदूक सोबत घेऊन राजापूर पन्हाळे परिसरात शिकारीसाठी गेले होते. मोटारसायकलवर बसून आपल्या ताब्यातील बंदूक मोटरसायकलच्या उजव्या बाजूला खांद्यावर लावून जॅकेटमध्ये लपवून नेत असत.
मध्यरात्री घरातून कुणालाही न सांगता ते निघून गेले होते. साधारण पहाटे दोन-अडीचच्या सुमारास पन्हाळे माळवाडी येथील जंगलमय भागात होजवाडी कच्च्या रस्त्यावर आले असता त्यांच्या छातीवर गोळी लागली. त्याच स्थितीत त्यांनी महादेव चव्हाण यांना फोन केला. त्यांच्या फोनमध्ये संपूर्ण कॉल रेकॉर्ड होते.
तब्बल २० मिनिटे हे कॉल रेकॉर्ड सुरू होते. या कॉल रेकॉर्डमध्ये नितीन हे विव्हळत पडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. फोनवरून महादेव यांना नितीन यांनी आपणास बंदुकीची गोळी लागल्याचे सांगितले. त्यामुळे महादेव चव्हाण हे आपला मुलगा आणि शेजारी यांना घेऊन मोटारीने पन्हाळे माळवाडी येथे गेले असता नितीन चव्हाण हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मोटारीने त्यांना उपचारांसाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.