
मोदी @ ९ अंतर्गत रत्नागिरीत भाजपाचे कार्यक्रम : जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन
पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी ज्येष्ठ नागरिक संमेलन, बाईक रॅली
व्यापारी, बुद्धिवंतांचे संमेलनही होणार
रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात ज्येष्ठ नागरिक संमेलन, बाईक रॅली, बुद्धिवंत संमेलन, व्यापारी संमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. या दृष्टीने विविध जबाबदाऱ्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
मोदींच्या गौरवशाली विकास पर्वाला ९ वर्षे पूर्ण होत असताना थेट नागरिकांपर्यंत मोदी शासनाचा लेखाजोखा सादर करणे, जनमानसातील प्रतिक्रिया जाणून घेणे, थेट नागरिकांना संपर्क करत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देणे, यासाठी मोदी @ 9 हा उपक्रम भाजपाने ठरवला आहे, तो यशस्वी करण्यासाठी संघटना सक्रिय झाली आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासन काळातील कलम ३७० रद्द करणे, नव्या संसद भवनाची निर्मिती, भव्य राम मंदिराची निर्मिती, गोरगरिबांपर्यंत थेट पोहोचवलेल्या अनेक लाभयोजना, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची उंचावलेली शान, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, डिजिटलायझेशन, तसेच आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत योजना, मोठ्या प्रमाणावर जनतेला बॅंकिंग नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न, या योजना मोदी @ ९ मध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. जनतेपर्यंत संपर्क साधला जात आहे. जनमानस जागरुक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमात भाजपचे कार्यकर्ते हे सक्रिय सहभागी होत आहेत. यातून रत्नागिरी भाजपाची ताकद अधिक वृद्धींगत होणार आहे, असे ॲड. पटवर्धन म्हणाले.
असे होतील कार्यक्रम
१७ जून सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नागरिक संमेलन, स्थळ भाजपा कार्यालय, बाईक रॅली सायंकाळी ५ वाजता मारुती मंदिर ते भाजपा कार्यालय. २१ जून योगदिन तालुक्यात विविध ठिकाणी आयोजन, २४ जून सायंकाळी 5 वाजता बुद्धिवंत संमेलन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, २५ जून सकाळी ११ वाजता व्यापारी संमेलन, भाजपा कार्यालय.