आ. साळवींच्या दणक्याने मुंबईच्या प्रवाशांना मिळाली एसटी बदलून
रत्नागिरी :एसटी महामंडळ इलेक्ट्रीक बसेस वापरण्याच्या तयारीत असताना, रत्नागिरी आगारातून अजूनही लांबपल्ल्यासाठी नादुरुस्त बसेस पाठविण्याचा आटापिटा सुरु आहे. मोडलेल्या सीट, तुटलेल्या खिडक्या व गाडीची अवस्था बघून प्रवाशांनी मुंबई गाडीत बसण्यास नकार दिला. हा प्रकार आमदार राजन साळवी यांना समजल्यानंतर त्यांनी थेट आगारप्रमुखांना गाठत नवी गाडी सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे प्रवाशांनीही समाधान व्यक्त करीत पुढील प्रवास केला.
एसटीची प्रवासी संख्या वाढावी यासाठी शासन विविध योजना राबवत असते. मात्र आजही एसटीकडे असणार्या गाड्यांची स्थिती अत्यंत वाईट अशी आहे. तशाच परिस्थितीमध्ये गाड्यांमधून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. मुंबईला जाण्यासाठी अशीच दुरावस्था झालेली गाडी बस स्टॅण्डवर लागली होती. यातील काही सीटची अवस्था अत्यंत दयनिय झाली होती. खिडक्या तुटलेल्या होत्या. सीट पडतील कि काय अशा स्थितीत हलत होत्या. गाडीचे गियर बदलतानाही मोठा आवाज होत होता. अशा अवस्थेत गाडी मुंबईला पोहचेल की नाही अशी शंका प्रवाशांना येऊ लागली. यातीलच मिर्या गावातील रहिवाशी साक्षी पेडणेकर यांनी रहाटाघर येथून गाडी बाहेर पडण्यापूर्वीच थांबवत दुसरी गाडी सोडण्याची विनंती वाहतूक नियंत्रकांना केली. त्यानंतर हा विषय आगारप्रमुखांपर्यंत गेला. मात्र गाडी बदलून देण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे पेडणेकर यांनी आपले मामा व गणपतीपुळेचे शिवसेना शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांच्याशी संपर्क करीत घटनेची माहिती दिली. सुर्वे यांनी घडला विषय आमदार राजन साळवी यांच्या कानावर घातला. समाजाच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहणार्या राजन साळवी यांनी रहाटाघर गाठत गाडीची अवस्था पाहिली आणि एसटीच्या अधिकार्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर मुंबई प्रवाशांना नवी गाडी देण्याची मागणी केली. अखेर आ. साळवी यांच्या प्रयत्नाने मुंबईत जाणार्या प्रवाशांना गाडी बदलून देण्यात आली. ही गाडी मार्गस्थ झाल्यानंतरच आ. साळवी हे रहाटाघरमधून बाहेर पडले.