
भाट्ये समुद्रकिनारी रंगली ओपन सर्फ फिशींग स्पर्धा
रत्नागिरी: फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशींग स्पर्धेत सातारा येथील संतोष यादव यांनी वाघळी मासा पकडून प्रथम क्रमाकांचे पारितोषीक पटकावले. त्याचा आकर्षक चषक, रोख ५०हजार रूपये, रॉड आणि रिळ देऊन गौरव करण्याा आला. रविवारी (ता. 28) भाट्ये किनारी रंगलेल्या या स्पर्धेत ११० जणांनी सहभाग घेतला होता.
कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या दृष्टीकोनातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी फिशर्स क्लबने आयोजित केलेल्या ओपन सर्फ फिशींग टुर्नामेंट रविवारी भाट्ये किनाऱ्यावर पार पडली. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत अनेकांनी भाग घेतला होता. भाट्ये बिचवर रविवारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक संतोष यादव (सातारा) यांनी मिळवले. त्यांनी वाघळी मासा पकडला. त्यांना आकर्षक चषक, रोख रूपये ५० हजार सोबत रॉड आणि रिळ देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक रत्नागिरीतील सुजित मयेकर यांनी पटकावले. त्यांना ३० हजार रूपये रोख आणि सोबत रॉड आणि रिळ देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय पारितोषिक पंकज पुसाळकर (रत्नागिरी) यांनी मिळवले. त्यांना रोख रु. २० हजार, स्मृतिचिन्ह रॉड आणि रिळ देऊन गौरविण्यात आले. चौथे पारितोषिक महंमद अली यांनी पटकावले. त्यांनाही गौरविण्यात आले. याशिवाय अन्य बक्षिसांमध्ये फर्स्ट कॅच मयुर बंडबे, लास्ट कॅच सुरज बावणे, मोअर कॅच महेश तळवणेकर, युनिक कॅच लालजी कांजी सोलंकी, गेस्ट अँगल सोहम प्रशांत सावंत, फिमेल अँगलर श्रेया परेश भागवत यांनाही बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. पारितोषीक वितरणाला उद्योजक किरण सामंत, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, भाट्ये सरपंच सौ. प्रीती पराग भाटकर, माजी सरपंच पराग भाटकर, राजेश पाटील, सौ. सुमेधा भाटकर, सौ. रमिझा भाटकर आदी उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक नित्यानंद भुते यांनी सर्वांचे स्वागत केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी फिशिंग क्लबचे संतोष सावंत, केतन भोंगले, आसिफ मोहम्मद रोहित बिर्जे, डॉ. अभय धुळप तर रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या १० सभासदांनी मार्शल्सची भूमिका पार पाडली. स्पर्धकांच्या सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट व फर्स्ट एडची सोय केली होती. या स्पर्धेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा, गुजरात, दिव दमण, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, पुणे, सातारा, रायगड, सांगली, कोल्हापूरमधून ११० स्पर्धकांनी सहभागी होत स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धेत एकूण ११० विविध जातीचे मासे पकडले गेले व त्यांना त्वरित मुक्त करण्यात आले. पुढच्या वर्षी याहीपेक्षा भव्य राष्ट्रीय स्पर्धा रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून पार पाडू असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांनी व्यक्त केले.

