
राजापूरजवळ मोटार- ट्रक अपघातात एक गंभीर जखमी
राजापूर, : महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे हॉटेल गुरुमाउली येथे मोटार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात मोटारीतील राजापूर कुणबी पतपेढीच्या महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत.
सानिका पुजारी व संदीप पुजारी (दोघे रा. हर्डी, ता. राजापूर) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. ३०) सकाळी महामार्गावरील हॉटेल गुररुमाऊलीसमोर झाला. संदीप पुजारी हे मंगळवारी पत्नीला कुणबी पतपेढीच्या ओणी शाखेत सोडण्यासाठी मोटारीने जात होते. हॉटेल गुरुमाऊलीसमोर आले असता समोरून अचानक वेगाने ट्रक आला. ट्रक, मोटारीच्या दिशेने येत असल्याचे पाहून त्यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी लगतच्या कठड्यावर आदळली. त्यानंतर ट्रकही त्याच ठिकाणी उलटला आणि त्याचा काही भाग भागही मोटारीवर कोसळला. या अपघातामध्ये सानिका पुजारी यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. संदीप पुजारी हे किरकोळ जखमी झाले. दोघांनाही राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सौ. पुजारी यांच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग येथे हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच प्रकाश मांडवकर, जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.