जिल्हा परिषद राबवणार प्लॅस्टीकमुक्त श्रमदान मोहिम
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी प्लॅस्टीकमुक्त श्रमदान मोहिम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार असून कचऱ्याचे साम्राज्य असलेली ठिकाणे शोधून तो स्वच्छ करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच गाव प्लॅस्टीकमुक्त करण्यासाठी या मोहिमेंतर्गत एक महत्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.
प्लॅस्टीकमुक्त श्रमदान मोहिमेत सामान्य नागरीक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, शालेय विद्यार्थी, नेहरू युवा केंद्र, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विश्वासू सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पोलीसदल, दवाखाने, शेतकरी संघटना व ग्रामपंचायतीचा सक्रीय सहभाग राहणार आहे. पहिल्या टप्यात गावातील कचऱ्याचे साम्राज्य असलेली ठिकाणे शोधून जिल्हा परिषदेच्या अॅपवर जीओ टॅगइन करून तशी नोंद करणे, जेणेकरून गावातील कचरा किती ठिकाणी टाकला जातो याची जागा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी पुन्हा कचरा बंद करण्याविषयी सुचना देण्यात येणार आहेत. तसेच बचतगटातील महिलांना कापडी व कागदी पिशव्या तयार करण्याकरीता बैठका घेऊन प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गावातील आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या सहाय्याने प्लॅस्टीकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीतून 12 किलो प्लॅस्टीक
या मोहिमेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 12 किलो प्लॅस्टीक गोळा करण्यात येणार आहे. एकत्रित गोळा करण्यात आलेला प्लॅस्टीक कचरा तालुका स्तरावर उभारण्यात आलेल्या प्लॅस्टीक कचरा संकलन केंद्रावर वाहून नेण्यात येणार आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील गोळा झालेला प्लॅस्टीकचा कचरा एमआयडीसी खडपोली येथे आणि राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर या तालुक्यातील गोळा झालेला प्लॅस्टीकचा कचरा झाडगाव एमआयडीसी रत्नागिरी येथे पाठवण्यात येणार आहे.