कोकणातील आठ कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा
रत्नागिरी :गेल्या चार वर्षांत तांत्रिक कारणांमुळे कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळू शकलेला नाही. मात्र आता कोकणातील आठ कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे मोठ्या प्रमाणात कातळशिल्पे आहेत. गेल्या वर्षीच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत बारसू गावातील कातळशिल्पासह एकूण आठ ठिकाणची कातळशिल्पे समाविष्ट करण्यात आली. त्या शिवाय आता कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव 2018 मध्येच सादर करण्यात आला होता.
गेल्या काही वर्षांत रत्नागिरी-राजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कातळशिल्पांचा शोध लागला आहे. पुरातन काळातील संस्कृती या कातळशिल्पांतून दिसते. या कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. तसेच या कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यास त्यांचे जतन संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य आहे. त्या दृष्टीनेच कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव 2018 मध्येच राज्य पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळू शकलेला नाही. बहुतांश कातळशिल्पे खासगी जागांमध्ये आहेत. त्यामुळे राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी त्या जागा मालकांशी चर्चा, त्यांची परवानगी, जागेचा सात-बारा मिळवणे आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागला. मात्र, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, आठ कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला जाणार
आहे.