
अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील धनजी नाका येथे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या मुबीन रशिद हकीम (वय 22), मस्तान शेख (वय 24) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूद्ध एनडीपीएस कायदा कलम 8(क),20(ब), 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात होणारी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक श्री.धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक सौ.जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक डॉ.समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
या पथकातील पोलीस अंमलदार शांताराम झोरे यांना त्यांच्या खास खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार धनजी नाका येथील रशीद हकीम यांचा मुलगा मुबीन हकीम हा अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने त्यांच्या निवासस्थानावर धाड टाकली. यावेळी एका बंद खोलीत दोन तरूण बसले होते. खोलीमध्ये सिगारेटचे अर्धवट जळालेले तुकडे टाकण्यात आले होते. पोलिसांनी खोलीतील मुबीन हकीम, मस्तान शेख या दोघांची झडती घेतली असता 2.94 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, 16.58 ग्रॅम गांजा आढळला. त्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले आहेत.
डॉ.समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संजय पाटील, अमर पाटील, पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, पोलीस अंमलदार शांताराम झोरे, विलास दिडपसे, नितीन डोमणे, अरूण चाळके, बाळू पालकर, सागर साळवी, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, योगेश नार्वेकर, विवेक रसाळ, विद्या लांबोरे, छाया चौधरी, सांची सावंत, अक्षय कांबळे यांनी ही कामगिरी केली.