रत्नागिरीत निघणार विराट हिंदू गर्जना मोर्चा
रत्नागिरी, ः रत्नागिरीमध्ये लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज, धर्मांतरण आणि गोहत्या आदी प्रकार वाढले आहेत. या विरोधात सकल हिंदू समाज एकवटला आहे. या हिंदू समाजातर्फे शनिवारी (ता. १५) सायंकाळी विराट हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण याबाबतचे कायदे त्वरित व्हावेत, अशी मागणी या वेळी केली जाणार असून महाराष्ट्रात याकरिता ४० मोर्चे काढण्यात आले आहेत. रत्नागिरीतील मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे.
हिंदू गर्जना मोर्चाची सुरवात श्री शिवतीर्थ मारूती मंदिर येथून १५ ला सायं. ४ वा. होणार आहे. हा मोर्चा मारूती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, रामआळी, गोखलेनाका येथून स्वा. लक्ष्मीचौक, गाडीतळ येथे समारोप होणार आहे. मोर्चामध्ये रत्नागिरी तालुक्यासह संगमेश्वर, देवरूख, राजापूर, लांजा आदी ठिकाणचे किमान १० हजार हिंदू बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत.
हिंदू गर्जना मोर्चासंदर्भात माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी संतोष पावरी, राकेश नलावडे, केशव भट, संजय जोशी आणि चंद्रकांत राऊळ उपस्थित होते. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मातरण याबाबतचे कायदे त्वरित व्हावेत, यासाठीच हिंदू गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाला योगिता साळवी, धनंजय देसाई व विनय पानवळकर मार्गदर्शन करणार असल्याचे भट म्हणाले. एनआरसीसारखा कायदा व्हावा, समान नागरी कायदा आणावा म्हणूनच आता प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरणार आहे, असे चंद्रकांत राऊळ म्हणाले.