हापूस आणि मे महिना असे समीकरण बिघडण्याची भीती
रत्नागिरी :दरवर्षी हापूसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु हापूसप्रेमी, खवय्ये मे महिन्याची आतूरतेने वाट पाहत असतात. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात, शिवाय परिपक्व हापूस दाखल होतो. तसेच दरही आवाक्यात असतात, त्यामुळे मोठ्या संख्येने ग्राहकांची पावले हापूस खरेदीकडे वळतात. दरवर्षी हे चक्र सुरू असले तरी यंदा मात्र उलट परिस्थिती निर्माण होणार आहे. दरवर्षी मे महिन्यात 90 हजार ते 1 लाख पेट्या दाखल होत असतात, मात्र यंदा अवकाळी पावसाने उत्पादनावर परिणाम झाला असून, मे महिन्यात हापूसचे आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही चढे रहणार असल्याने मे महिना आणि आंबा हे समिकरण विस्कळीत होण्याची शक्यता आहे.