मिरजोळे एमआयडीसीत घनकचरा प्रकल्पाला आग
रत्नागिरी : येथील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील ‘रत्नाग्रीन टेक्नो सर्व्हिसेस’ या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या गोडाऊनमधील कचऱ्याला शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सुक्या कचऱ्याने पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि आकाशात धुराचे उंचच उंच लोळ पसरले. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मनीष आपटे यांच्या मालकीचा हा प्रकल्प असून येथे ओला कचरा जिरवणारे युनिट, बायोगॅस तसेच सुका कचरा संकलन आणि प्रक्रियेचे काम केले जाते. शनिवारी रात्री गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. सुका कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांबूनही स्पष्ट दिसत होते.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाचे पथक बंबासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी त्वरित पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आग आतल्या बाजूने धुमसत होती आणि आगीची तीव्रता अधिक होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा दुसरा टँकर तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग प्रयत्न करून दोन्ही टँकरच्या मदतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि आग विझवली. वेळीच मदत मिळाल्याने ही आग प्रकल्पातील बायोगॅस युनिट किंवा आजूबाजूच्या इतर औद्योगिक परिसरात पसरली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेत झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.