आंतरराष्ट्रीय मच्छीमार महिला दिनानिमित्त वरवडे येथे इनरव्हील तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय मच्छीमार महिला दिनाचे औचित्य साधून मच्छीमारबहुल वरवडे, रत्नागिरी येथे इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये ग्रामस्थांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. सांबरे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून रुग्णांना मोफत औषधांचे वाटप केले. नंदादीप नेत्रालयाच्या सहकार्याने डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच चष्मे उपलब्ध करून देण्यात आले, तर दंत तपासणीचे कार्य इनरव्हील च्या सचिव डाॅ. प्रियांका कांबळे यांनी केले. स्थानिक महिला आणि इतर गरजू पर्यंत शिबिराची माहिती पोहोचविण्याचे कामी चंंडिकादेवी एफ एफ पी ओ संस्थेच्या अध्यक्ष रिना सुर्वे आणि अस्विता पटेकर यांचे सहकार्य मिळाले. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन के प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी जागतिक मच्छिमार महिला दिनाचे महत्त्व विशद केले आणि सागरी मत्स्य व्यवसाय महिलांच्या कार्याची सन्मान जनक उल्लेख आणि नोंद आवश्यक असल्याचे सांगितले .
मच्छीमार समाजातील महिला व ग्रामस्थांना आरोग्यविषयक सुविधा त्यांच्या गावातच मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आणि आयोजकांचे आभार मानले. यावेळी इनर व्हील आय एस ओ प्रज्ञा गांधी उपस्थित होत्या .
याच शिबिराच्या वेळी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या डॉ सुशील कांबळे, शुभम महाडिक आणि आदित्य शेटे यांनी उपस्थित मच्छीमारांना सागरी मासेमारी व्यवस्थापना ची माहिती पोस्टर्स द्वारे समजावून सांगितले .
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या डॉ पगारकर आणि श्री नरेंद्र चौगुले यांनी मत्स्य शीतलीकरण आणि त्यातील आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली .
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत मच्छीमार समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा स्तुत्य प्रयत्न जागतिक मच्छीमार महिला दिनानिमित्त करण्यात आला.