रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस देणार
सुनील तटकरे यांचा पलटवार
मुंबई: रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. अलीकडच्या काळात कदमांची मानसिक स्थिती पाहता ठाण्यापेक्षा आग्रा येथील मानसोपचार तज्त्राकडे त्यांनी उपचार घ्यायला हवेत. रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस देणार आहे. उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी रामदास कदमांवर केलेल्या आरोपांची उत्तरे आधी कदम यांनी द्यायला हवी. कदम यांनी स्वत:ची प्रतिमा काय आहे ते लोकांसमोर दाखवावे अशा शब्दात सुनील तटकरे यांनी घणाघात केला आहे.
कदम यांनी केलेल्या आरोपांवरून सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, कपोलकल्पित निराधार आरोप करणे हे ढासळलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार व्हावेत. यापुढे जर त्यांनी कोणते आरोप केले तर त्यावर मी खुलासा करणार नाही. रामदास कदमांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. विकृत मनोवृत्तीचे आरोप काही जण करतात. रामदास कदमांनी त्यांच्या विधानांवर ठाम राहावे. कायदेशीर त्यांना उत्तर द्यावे लागेल. मी कुणाचा आहे की नाही याबाबत रायगडच्या जनतेला माहिती आहे. जनतेने मला ४० वर्ष सातत्याने निवडून दिलंय. तुम्ही पराभूत झाल्यानंतर पुन्हा उभे राहिला नाही असा टोला त्यांनी लगावला.
तसेच २००९ च्या पराभवानंतर रामदास कदम मला भेटायला आले होते. माझ्या हातापाया पडले, विनवणी केली. त्यानंतर त्यांना घेऊन मी अजितदादांकडे गेलो. पक्षात प्रवेशासाठी आणि मंत्रिपद देण्याची त्यांची मागणी होती. ते मला कुठली निष्ठा शिकवतात? त्यामुळे आता Enough is enough..तुम्हाला काहीही बोलायचे ते बोला, शिवराळ भाषेत बोला. वैचारिक दिवाळखोरी कुणाची किती हे महाराष्ट्राने पाहिले आहे. यापेक्षा मला जास्त काही बोलायचे नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, लोक सुज्ञ आहेत. आम्हाला मिळालेले यश त्यांना पचवता येत नाही. त्यामुळे खालच्या पातळीची टीका केली जातेय. जे नेते बोलताहेत त्यांची वैचारिक पातळी सगळ्यांना माहिती आहे. आज जे माझ्याबद्दल बोलताहेत त्यांनी भाजपा नेतृत्वाबाबतही टीका केली होती. प्रत्येकाने आपली पातळी वैचारिक सिद्ध करायची असते. मी माझ्या कुठल्याही पत्रकार परिषदेत चुकीचे विधान केले नाही. मला कधी दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली नाही. आज राज्यात महायुतीला जे प्रचंड यश मिळाले, ते यश नेत्यांनी टिकवले पाहिजे. अलीकडे काही नेते महायुतीत वाद निर्माण होणारी विधाने करत आहेत. त्यांची नोंद वरिष्ठ घेतील असंही तटकरेंनी सांगितले.
महायुतीत साम्यंजस्य राहावे यासाठी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वयाची भूमिका राहिली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही माझी भूमिका ठाऊक आहे. त्यामुळे जे दखल पात्र नाहीत, अशा नेत्यांवर फार लक्ष देण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे ते योग्य दखल घेतील. २००९ नंतर रामदास कदम जनतेसमोर उभे राहिले नाहीत. एका कालावधीत अशी टीका होत असते. या काळात आपण आणखी मजबूत होतो. टीकाटिप्पणी करताना काय शब्द वापरावे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाने शिकवले आहेत. काही विकृत लोक असतात त्यासारखे रामदास कदम आहेत असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.