बसच्या चाकाखाली आल्याने महिला गंभीर जखमी
बस चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी):
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई वर उमरोली बाजारपेठ येथे एस.टी. बसमधून उतरताना एक भीषण अपघात घडला. महिला प्रवासी बसमधून उतरल्यानंतर तिची साडी बसच्या दरवाजात अडकल्याने ती रस्त्यावर पडली आणि बसचे मागील चाक तिच्या पायावरून गेले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, एस.टी. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४५ ते ९ वाजण्याच्या सुमारास घडला. गुहागर ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी एस.टी. बस (क्रमांक MH 09 EM 8718) उमरोली बाजारपेठ येथून जात होती. बसमधील प्रवासी महिला प्रिता पंकज धातकर (वय ३५, रा. पडवे काताळे, ता. गुहागर) यांनी चालकाला त्यांचा ठरलेला थांबा ‘घोणसरे हॉस्पिटल’ येथे बस थांबवण्यास सांगितले होते.
मात्र, चालक चंद्रमुनी गोविंदराव जोगदंड (मूळ रा. वाघाळा, ता. आंबेजोगाई, जि. बीड; सध्या रा. गुहागर डेपो) याने ठरलेल्या थांब्यावर बस न थांबवता उमरोली बाजारपेठ येथे बस थांबवली. महिला प्रवाशाने गाडीतून खाली उतरल्यानंतर ती सुरक्षित अंतरावर गेली आहे की नाही, याची खात्री न करता चालकाने बेदरकारपणे व निष्काळजीपणे बस पुढे चालवली. यावेळी प्रिता धातकर यांच्या साडीचा पदर बसच्या दरवाज्यात अडकल्याने त्या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. याच वेळी बसचे डाव्या बाजूचे मागील चाक त्यांच्या डाव्या पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
या घटनेप्रकरणी बसचे वाहक सतीश कुंडलिक चव्हाण (वय ४७, रा. पळशी, ता. खानापूर, जि. सांगली; सध्या रा. गुहागर डेपो) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.५२ वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक चंद्रमुनी जोगदंड याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व भा.द.वि. कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.