लांजा येथील ‘आजी-आजोबांचे गाव’ येथे निराधार वृद्धांसोबत साजरी केली दिवाळी
एकता मेकॅनिक असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी:
दिवाळीत समाजातील निराधार आणि वंचित घटकांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश फुलावा, या उदात्त भावनेतून ‘एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन’च्या वतीने प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कष्टाच्या पैशातून माणुसकीची दिवाळी साजरी करत या संघटनेने लांजा येथील ‘आजी-आजोबांचे गाव’ येथील वृद्धांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप केले.
प्रामाणिक कष्टाच्या जोरावर आपली उपजीविका चालवणारा मेकॅनिक वर्ग केवळ स्वतःचा विचार न करता समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो, या भावनेतून पुढे सरसावला आहे. या उपक्रमांतर्गत लांजा येथील वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ, मोती साबण, उटणे, पावडर, सुवासिक तेल, खोबरेल तेल, अत्तर, खाऊ, पणत्या, गोड मिठाईचे बॉक्स, टॉवेल, बेडशीट आणि उशी कव्हर्स प्रदान करण्यात आले. तसेच आकाशकंदील, बल्ब, वायर, होल्डर आणि टू-पिन यांसारखे विविध उपयोगी साहित्यदेखील दिवाळी भेट म्हणून सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमाबाबत बोलताना संयोजकांनी सांगितले की, दिवाळी केवळ स्वतःच्या घरात दिवे लावून साजरी करण्यात नसून, इतरांच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यात खरी मजा आहे. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि त्यांना मिळालेली आपुलकीची जाणीव हेच या सर्व मेकॅनिक बांधवांसाठी दिवाळीचे सर्वात मोठे बक्षीस ठरले आहे.
हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध वेल्डर महेंद्र शेरवे, सामाजिक कार्यकर्ते मयुरेश भितळे, प्रसिद्ध मेकॅनिक श्रीधर चोपडे, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फैयाज खतीब, पावस विभाग असोसिएशनचे अध्यक्ष महेश पालकर, लांजा येथील प्रसिद्ध मेकॅनिक तथा असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद पवार, असोसिएशनचे सचिव तथा रत्नागिरी तालुका मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय कदम, जिल्हासंघटक पारसशेठ खानविलकर, ज्येष्ठ मेकॅनिक नितीनशेठ गुरव, संभाजी गेजगे, अनिल सुतार, सुरेश माळी, भावेश माचिवले, समीर शेट्ये, प्रदीप रेवाळे, अक्षय लोंढे, दिलीप शिंदे, गणेश शेंडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडणेकर व हैरी हरचिरकर यांनी बहुमोल आर्थिक सहकार्य व सक्रिय सहभाग नोंदवला.
कष्टकरी, स्वयंरोजगारी आणि आत्मनिर्भर असणाऱ्या या मेकॅनिक बांधवांनी आपल्या कष्टाच्या कमाईतील काही हिस्सा समाजहितासाठी खर्च करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने गरजू आणि वंचितांच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी एकता मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.