दापोलीत मटका जुगारावर एलसीबीचा छापा
मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल
दापोली : दापोली शहरातील वर्दळीच्या बुरोंडी नाका परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका जुगारावर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी एका संशयिताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद नथुराम घोडे (वय ५५, रा. काळकाई कोंड, दापोली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुरोंडी नाका परिसरातील एका टपरीच्या आडोशाला मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संशयित ठिकाणी अचानक छापा टाकला. या वेळी प्रसाद घोडे हा मटक्याचे आकडे लिहून जुगार चालवत असल्याचे रंगेहात मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून २ हजार ३६० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराच्या नोंदी असलेले साहित्य असा ऐवज ताब्यात घेतला.
या प्रकरणी प्रसाद घोडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल रूपाली यादव या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत. भरवस्तीत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.