कुवारबाव येथे ९५.९५ कोटींच्या उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ
जून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
रत्नागिरी:
मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुवारबाव येथे पाटबंधारे कार्यालय ते रेल्वेस्थानक फाट्यादरम्यान प्रस्तावित चारपदरी उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलामुळे रत्नागिरी शहरातून हातखंबा आणि नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक अधिक गतिमान व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
कुवारबाव येथील सुमारे ९२५ मीटर लांबीच्या या पुलासाठी ९५ कोटी ९५ लाख ७७ हजार ७७७ रुपये खर्च अपेक्षित असून, जून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे.
मिऱ्या ते नागपूर या चारपदरी महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून, रत्नागिरी ते आंबा घाट या टप्प्यातील प्रमुख रस्ता रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गावरील काही किरकोळ आणि उर्वरित कामे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
कुवारबाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौपदरीकरणाचे काम आधीच पूर्ण केले आहे. भविष्यातील उड्डाणपुलाचे नियोजन लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा रस्ता पुढे स्थानिक वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड म्हणून वापरला जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांची आणि महामार्गावरील द्रुतगती वाहतुकीची कोंडी फुटणार असून अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.