स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर ‘माचाळ’ गावात पहिल्यांदाच धावली लालपरी
लांजा : देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७८ वर्षे उलटली, विज्ञानाने मोठी प्रगती केली; मात्र कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका दुर्गम गावात एसटी बस पोहोचण्यासाठी चक्क स्वातंत्र्याची ७८ वर्षे वाट पाहावी लागली. लांजा तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य माचाळ या गावात रविवारी (१ नोव्हेंबर) जेव्हा पहिल्यांदा लालपरीने (एसटी बस) प्रवेश केला, तेव्हा संपूर्ण गावात दिवाळीसारखा जल्लोष पाहायला मिळाला.
गावात पहिल्यांदाच एसटी आल्याचे पाहून वयोवृद्ध आजी-आजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर महिलांनी आरती ओवाळून आणि तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून लालपरीचे जंगी स्वागत केले. पिढ्यानपिढ्या केवळ डोंगराची पायपीट करणाऱ्या माचाळवासीयांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला आहे.
आजारी रुग्णांना न्यावे लागायचे डोलीतून!
लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेले आहे. निसर्गाचे अप्रतिम वरदान लाभलेल्या या गावाला थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने स्वातंत्र्यानंतर आजवर गावकऱ्यांना डोंगर-दऱ्या, कपारी तुडवत तासन् तास पायपीट करावी लागत होती. गावात कोणी आजारी पडले किंवा गरोदर मातेला प्रसूतीसाठी न्यायचे असल्यास थेट डोली किंवा झोळी करून डोंगर उतरण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. शाळेत जाणाऱ्या मुलांचीही मोठी दमछाक होत होती. या खडतर परिस्थितीवर मात करण्यासाठी माचाळ पर्यटन संस्थेचे विवेक सावंत आणि ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून रस्ता आणि एसटी बससाठी अविरत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
लांजा आगारातून सुटली पहिली बस
स्थानिक आमदार किरण सामंत, पंचायत समिती सदस्य उमेश पत्की आणि ग्रामस्थांच्या अखंड प्रयत्नांना अखेर यश आले. रविवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी लांजा एसटी आगारातून पहिली लालपरी माचाळच्या दिशेने रवाना झाली. ही बस केळवली आणि भोजवाडी मार्गे जेव्हा घाटातील वळणावळणाच्या नव्या रस्त्यावरून माचाळच्या वेशीवर पोहोचली, तेव्हा गावकऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. संपूर्ण गावातील अबालवृद्ध रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून टाळ्या वाजवत होते.
फटाक्यांची आतषबाजी अन् पेढ्यांची मेजवानी
बस गावात दाखल होताच महिलांनी एसटीचे पूजन केले. गाडी चालवणारे चालक आणि वाहक (कंडक्टर) यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आणि महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर संपूर्ण गावात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या बससेवेमुळे आता माचाळमधील शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि शेतकऱ्यांची वाहतुकीची मोठी समस्या कायमची सुटली असून, निसर्गप्रेमी पर्यटकांनाही आता ‘मिनी महाबळेश्वर’ माचाळला थेट एसटीने भेट देणे सहज शक्य होणार आहे.