रत्नागिरीतील उद्यमनगर हादरले; तारा वैभव रेसिडेन्सिमध्ये पहाटे दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांचा थरार
रत्नागिरी शहरानजीकच्या उद्यमनगर परिसरातील तारा वैभव रेसिडेन्सिमध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरीची थरारक घटना घडली. या इमारतीमधील दोन बंद फ्लॅटचे टाळे तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लांबवला. चोरी करून पसार होत असताना सतर्क वॉचमनने त्यांना हटकले असता, चोरट्यांनी थेट वॉचमनवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे उद्यमनगर परिसरासह संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन चोरटे तारा वैभव रेसिडेन्सिच्या परिसरात संशयास्पद हालचाली करत दाखल झाले. त्यांनी इमारतीमधील दोन बंद फ्लॅटची कुलूपे तोडून आत प्रवेश केला. दोन्ही फ्लॅटमधील कपाटं उघडून चोरट्यांनी घरातील सोन्या-नाण्याच्या दागिन्यांवर आणि रोख रकमेवर डल्ला मारला. चोरीचे हे कृत्य आटोपून दोघेही चोरटे बाहेर पडत असताना, इमारतीची पाहणी करत असलेल्या सतर्क वॉचमनच्या नजरेस ते पडले.
पहाटेच्या वेळी संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या त्या दोघांना वॉचमनने हटकले आणि त्यांच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीपोटी चोरट्यांनी तात्काळ आपल्याकडील हत्यारे उपसली. दोघांपैकी एकाच्या हातातील कुऱ्हाड घेऊन त्यांनी वॉचमनवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेला वॉचमन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने जवळच असलेल्या आपल्या केबिनमध्ये पळाला आणि आतून कडी लावून घेतली. आणि बिल्डिंगच्या अध्यक्षांना फोन करून माहिती दिली.
वॉचमन केबिनमध्ये गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात एकच तारांबळ उडाली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथक दाखल झाले असून तपासण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे