रत्नागिरीनंतर राजापूर न्यायालयाला बॉम्बची धमकी
राजापूर :-
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याची घटना ताजी असतानाच आता राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश मिळाल्याने राजापूरमध्ये प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण न्यायालयीन इमारत रिकामी केली. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेले न्यायाधीश, वकील, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांचीही परिसरात गर्दी झाली. दरम्यान, राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सध्या बॉम्ब शोध पथकाकडून न्यायालयाच्या संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू आहे. इमारतीच्या कानाकोपऱ्याची पाहणी करून संशयास्पद वस्तूंचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.