दोहाच्या पटलावर समारा मोमिनच्या कथापुस्तकाची यशस्वी घोडदौड.
‘EMMA AND THE HIDDEN TREASURE’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन; ‘यंग ऑथर’ पुरस्काराने गौरव
रत्नागिरी : गुंबद मोहल्ला, सैतवडे येथील रहिवासी जनाब हशमद हसन मालिम यांची नात आणि रत्नागिरी येथील अझिझा दाऊद नाईक आयडियल स्कूलचे निवृत्त प्राचार्य डॉ. सिराज अहमद मोमिन यांची नात कु. समारा सोहेल अहमद मोमिन हिने साहित्य क्षेत्रात कौतुकास्पद यश संपादन केले आहे. समाराने स्वतः लिहिलेल्या ‘EMMA AND THE HIDDEN TREASURE’ या कथापुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दोहा, कतार येथे करण्यात आले.
समारा ही श्रीमती सनम सोहेल अहमद मोमिन यांची कन्या असून, लहान वयातच स्वतःच्या कल्पनाशक्तीला आणि लेखनकौशल्याला शब्दरूप देत कथापुस्तक प्रकाशित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा तिने गाठला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन तिला ‘Certificate of Excellence – Young Author’ या सन्मानाने गौरविण्यात आले.

समाराच्या या यशामुळे मालिम आणि मोमिन कुटुंबीयांसह संपूर्ण गुंबद मोहल्ला व सैतवडे परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बालवयातच लेखनक्षेत्रात घेतलेली ही भरारी इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.
समाराच्या या यशाबद्दल तिचे, तिच्या आई-वडिलांचे आणि संपूर्ण कुटुंबीयांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिने भविष्यातही अशीच उत्तुंग भरारी घेऊन आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.