सरदार पटेल जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलिसांतर्फे ‘सायबर सुरक्षा एकता दौड’ संपन्न
नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती
रत्नागिरी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी ‘सायबर सुरक्षा: डिजिटल युनिटी, सेफ फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित भव्य एकता दौडीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील एकात्मतेचा संदेश देणे आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये डिजिटल सुरक्षेविषयी जागृती निर्माण करणे हा होता.
सकाळी ७.०० वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणातून या दौडीला उत्साहात सुरुवात झाली. हातामध्ये सायबर सुरक्षेचे प्रबोधनात्मक बॅनर्स, फलक आणि जनजागृतीपर घोषणा देत ही दौड शहरातील प्रमुख मार्गांवरून जात प्रसिद्ध भाटे बीच येथे सकाळी ८.०० वाजता संपन्न झाली. सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना कोणती दक्षता घ्यावी, समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर कसा करावा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याविषयी या दौडीच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत प्रभावी संदेश पोहोचवण्यात आला.
या एकता दौडीमध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, पोलीस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथकाचे (आरसीपी) जवान तसेच सायबर पोलीस ठाण्याचे तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस दलातील विविध शाखांच्या या एकत्रित सहभागामुळे उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. एकात्मता आणि जनसुरक्षा या दोन्ही आघाड्यांवर पोलिसांनी राबवलेल्या या जनजागृतीपर मोहिमेचे शहरातील नागरिकांमधून विशेष कौतुक होत आहे.