मनसेच्या गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
दगडी चित्रकला सजावट ठरली प्रथम!
रत्नागिरी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६’चा अधिकृत निकाल आज रविवार, २५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. पर्यावरणाचा संदेश देत नागरिकांमध्ये सृजनशीलता आणि संस्कृतीची जोपासना व्हावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत मावळंगे येथील अजय प्रकाश पारकर यांनी बाजी मारत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी साकारलेली ‘दगडी चित्रकला सजावट’ ही पर्यावरणपूरक कलाकृती परीक्षण समितीचे विशेष आकर्षण ठरली. याशिवाय, गावोगावच्या आणि शहराच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी अतिशय कल्पकतेने साकारलेले देखावे या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
स्पर्धेचा अधिकृत निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे ज्यात प्रथम क्रमांक अजय प्रकाश पारकर (मु. पो. मावळंगे, तालुका: रत्नागिरी) यांच्या दगडी चित्रकला सजावटीला तर द्वितीय क्रमांक रजनीश रामजी वासावे (मु. पो. गावडे आंबेरे, तालुका: रत्नागिरी) यांच्या केदारेश्वर मंदिर गुहा देखावा सजावटीला याशिवाय तृतीय क्रमांक श्रेयस अजित मयेकर (विश्वनगर, रत्नागिरी शहर) यांच्या धूतपापेश्वर मंदिर देखावा सजावटीला मिळाला. सुतेज हरिश्चंद्र भाटकर (मु. पो. गोळप, तालुका: रत्नागिरी) यांच्या निसर्ग वाचवा सजावटीला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. निकाल जाहीर करताना रुपेश जाधव यांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी झालेल्या तमाम स्पर्धकांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच, गणपती बाप्पाच्या या सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यासाठी लवकरच एका भव्य पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाणार असून, या सोहळ्याची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी या प्रसंगी दिली आहे.