श्रींच्या चरणी ‘मास्टर ब्लास्टर’!
सचिन तेंडुलकर यांनी घेतले गणपतीपुळ्याच्या बाप्पाचे मनोभावे दर्शन
रत्नागिरी : भारतीय क्रिकेटविश्वातील महान फलंदाज आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडुलकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीने गणपतीपुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, क्रिकेटप्रेमींमध्येही त्यांच्या आगमनाची चर्चा सुरू झाली आहे.
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात सचिन तेंडुलकर यांनी विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आशीर्वाद घेतले. गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांनी त्यांचे स्वागत करून मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि या तीर्थक्षेत्राची वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिली.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या गणपतीपुळे भेटीमुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा गौरव वाढविणाऱ्या या महान खेळाडूने श्री गणरायाचे दर्शन घेतल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तेंडुलकर यांच्या या भेटीची चर्चा सध्या गणपतीपुळे परिसरात रंगली आहे.