पाचल परिसरात पावसाची संततधार; उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान
पाचल :17 ऑक्टोबर (वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील पाचल आणि पंचक्रोशीमध्ये गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत संततधार सुरू केली आहे. ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच या पावसाच्या सरींमुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. ऐन भातपीक काढणीच्या तोंडावर आणि काही भागात उशिराच्या पिकांसाठी पाण्याची गरज असताना झालेल्या या पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पाचल परिसरासह ग्रामीण भागात दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.सततच्या उन्हाच्या तडाख्यानंतर पाऊस सक्रिय झाल्याने हवेतील दमटपणा कमी होऊन आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. वातावरणातील या बदलामुळे पाचल व आसपासच्या गावांमध्ये थंडावा पसरला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.