न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेची जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी!
१४ व १७ वर्षांखालील मुलींचे दोन्ही संघ विभागस्तरावर; मुलांच्या संघांचेही घवघवीत यश
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
क्रीडा क्षेत्रात सातत्याने आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत प्रशालेच्या १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील दोन्ही वयोगटांतील मुलींच्या संघांनी जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावून कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले आहे. याचसोबत १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय, तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून प्रशालेची क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल यशाची परंपरा अधिक भक्कम केली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या मान्यतेने तसेच सह्याद्री बेसबॉल असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा यांच्या सहकार्याने या जिल्हास्तरीय स्पर्धेचे यजमानपद न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे यांनी भूषवले होते. जिल्ह्यातील विविध शाळांतील नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य आणि जिद्दीमुळे स्पर्धेतील सर्वच सामने अत्यंत चुरशीचे आणि प्रेक्षकांसाठी रंगतदार ठरले.
मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सह्याद्री बेसबॉल असोसिएशन, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. नितीन जाधव सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्पर्धेचा मूळ उद्देश, आयोजनामागील भूमिका आणि ग्रामीण भागात बेसबॉल खेळाच्या प्रसाराचे महत्त्व विशद केले. यानंतर शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडेचे उपाध्यक्ष मा. श्री. अब्दुल अजिज इस्माईल मुकादम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सिद्धी लांजेकर मॅडम यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून स्पर्धेत उतरलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. उदयराज कळंबे सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष नागरी सन्मान करण्यात आला. तसेच गतवर्षी कोल्हापूर येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून प्रशालेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्याला सह्याद्री बेसबॉल असोसिएशनचे सचिव श्री. सुनील वसंत अलकुटे सर, सदस्या सौ. समिधा नार्वेकर मॅडम यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आणि प्रशालेचे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच सतीश थुळ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सत्कोंडी ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय श्री. सतीशजी थुळ, उपसरपंच श्री. चंद्रकांत मालप आणि सदस्य श्री. अजय काताळे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. सर्व सामने पूर्ण झाल्यानंतर सरपंच श्री. सतीश थुळ यांच्या शुभहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. आपल्या मनोगतातून सरपंचांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करतानाच, “मुलींनी व मुलांनी मिळवलेले हे यश सैतवडे परिसराचा अभिमान वाढवणारे आहे, खेळाडूंनी विभागस्तरीय स्पर्धेतही अशीच चमकदार कामगिरी करून तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे,” अशा शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत इतर सामन्यांमध्ये स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस या संघाने प्रथम क्रमांक मिळवत चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या मुलांच्या संघाने द्वितीय, तर खेड-बोरज प्रशालेच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. संपूर्ण स्पर्धेतील सामने अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. श्री. वैभव भातमारे सर आणि श्री. सुरेश वडर सर यांनी मुख्य पंच म्हणून अत्यंत निष्पक्ष आणि पारदर्शक काम पाहिले. गुणलेखनाची जबाबदारीही सहकाऱ्यांनी कौशल्याने पार पाडली.
संस्था, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे विशेष योगदान
या भव्य स्पर्धेचे नेटके व नियोजनबद्ध आयोजन करण्यासाठी प्रशालेतील शिक्षिका सौ. नसिम शेकासन मॅडम, श्री. रमेश गंधेरे सर, श्री. हेमंत काताळे सर, श्रीम. प्रियांका पेढे मॅडम, कर्मचारी श्री. विनायक कोळवणकर, श्री. रविंद्र लवंदे, श्री. फैय्याज भाटकर, स्वयंपाकी सौ. सुवर्णा बैकर तसेच माजी विद्यार्थी श्री. ओमकार कदम व श्री. रुद्र कनगुटकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेचे सेवाज्येष्ठ शिक्षक श्री. संतोष चव्हाण सर यांनी उपस्थित मान्यवर, पंच, मार्गदर्शक शिक्षक, खेळाडू आणि स्पर्धेच्या यशासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन
प्रशालेच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सज्जाद अ. करीम सय्यद, सचिव श्री. समीर सय्यद, खजिनदार श्री. वहाब भाई खलपे, संस्था सदस्य श्री. गणी दळवी, श्री. जावेद काझी, श्री. रफिक मुल्ला, श्री. इम्रान चिकटे, श्री. लियाकत शेकासन आणि श्री. मुजफ्फर सय्यद सर यांनी सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सिद्धी लांजेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. साजिद शेकासन, उपाध्यक्ष श्री. उदय महाकाळ, सचिव श्री. दीपक लिंगायत व सर्व सभासद यांनीही खेळाडू पाठीवर कौतुकाची थाप मारत पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींच्या दोन्ही संघांची झालेली निवड आणि मुलांचे यश हे प्रशालेतील दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण आणि खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचे फलित असून, विभागस्तरावरही न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेचा डंका बागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.