रत्नागिरीत राजकीय वैमनस्यातून एमआयडीसीमध्ये तुफानी राडा
वाढदिवसाच्या पार्टीत जुन्या रागातून गाडीत घुसून तुफान हाणामारी, शहरात ‘शीतयुद्ध’ सुरू!
रत्नागिरी:-
रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरात सध्या एका खळबळजनक घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. काल रात्री १० वाजेच्या सुमारास रत्नागिरी एमआयडीसी परिसरात राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्यातून तुफानी राडा झाला. एका नेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जुन्या वादाची ठिणगी पडली आणि पाहता पाहता त्याचे रुपांतर थेट गाडीत घुसून केलेल्या जबर हाणामारीत झाले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून रत्नागिरीत आता सुप्त किंवा ‘शीत टोळी युद्ध’ सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरामध्ये एका स्थानिक नेत्याच्या वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या नेत्यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांसोबतच राजकीयदृष्ट्या विरोध असलेल्या काही लोकांनाही आग्रहाने आमंत्रित केले होते. सुरुवातीला सर्वकाही शांततेत सुरू होते आणि कोणाचीही कसलीही भानगड दिसत नव्हती. परंतु, या शांततेमागे काही दिवसांपूर्वीचा एक जुना राग धगधगत होता.
काही दिवसांपूर्वी हातखंबा येथील एका व्यक्तीने मिरकरवाडा येथील एका नेत्याविरोधात कारण नसताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते आणि त्याच्यावर तोंडसुख घेतले होते. हाच राग मिरकरवाडा गटातील कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसला होता. वाढदिवसाच्या पार्टीत सर्व विरोधी आणि सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते एकत्र आले असताना, याच जुन्या कारणावरून वाद पेटला. मनात साचलेला राग अचानक उफाळून आला आणि सत्तेत असलेल्या गटातील काही जणांनी त्या एका व्यक्तीला सर्वांसमोर चार-पाच कानाखाली लगावून दिल्या. या अनपेक्षित प्रकारामुळे पार्टीच्या ठिकाणी अचानक सन्नाटा पसरला, मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्या वेळी कोणीही मध्यस्थी करायला पुढे आले नाही.
कानशिलात बसल्यानंतर संबंधित व्यक्ती अपमानित होऊन तिथून निघून गेला आणि आपल्या गाडीत जाऊन बसला. तो गाडीतून निघून जात असतानाच पुन्हा एकदा दोन्ही बाजूंनी जोरदार शिवीगाळ झाली. या शिवीगाळीमुळे चिडलेल्या विरोधी गटातील मित्रांनी थेट त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून आत घुसून त्याला जबर मारहाण केली. गाडीतच झालेल्या या धुमश्चाक हाणामारीमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, हा प्रकार घडत असताना उपस्थित असलेल्या अनेकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली; कोणीही तो वाद सोडवण्याचा किंवा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही.
या तुफानी राड्यानंतर मारहाण करणारे आणि मार खाणारे दोन्ही गट तिथून पसार झाले असले, तरी या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण रत्नागिरी शहरात उमटू लागले आहेत. मार खाणारा नेमका कोण आणि मारणारा कोण, याबाबत आता शहराच्या कानाकोपऱ्यात, चहाच्या टपऱ्यांवर आणि नाक्यांवर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
या घटनेने रत्नागिरीतील राजकीय आणि सामाजिक वातावरणात एक नवीन वळण घेतले आहे. शहरात आता उघडपणे संघर्ष न होता ‘शीतयुद्ध’ सुरू झाल्याचे मानले जात आहे. कोणाशी बोलताना किंवा वक्तव्य करताना आता प्रत्येकाला विचारपूर्वक बोलावे लागणार आहे, कारण क्षुल्लक कारणावरून मनात धरलेला राग योग्य वेळ आल्यावर अशा हिंसक मार्गाने बाहेर येत असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे. काल रात्री एमआयडीसीत घडलेल्या या तुफानी राड्यामुळे रत्नागिरीतील शांतता ढवळून निघाली असून पुढील काळात याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.