कोणताही बडेजाव नाही, गाजावाजा नाही! पोलीस अधीक्षक नितीन बगाटे जिल्हा रुग्णालयात; शोकाकुल कुटुंबाला दिला दिलासा
रत्नागिरी /प्रतिनिधी
क्रिकेटच्या मैदानावर भविष्य घडवण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या दोन अल्पवयीन खेळाडूंचा कोळंबे येथील पाणवठ्यात बुडून झालेला मृत्यू मन सुन्न करणारा ठरला आहे. या दुर्दैवी घटनेने अवघा परिसर शोकसागरात बुडाला असतानाच, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांना धीर देताना बगाटे यांच्यातील संवेदनशील अधिकारी पुन्हा एकदा दिसून आला.
कल्याण क्रिकेट अकॅडमीचे शुभम यादव आणि सौरभ झा या दोघांचा वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. क्रिकेटच्या माध्यमातून भविष्य घडवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या मुलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा असह्य आघात झाला आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन दोन्ही कुटुंबीयांची भेट घेतली. आपल्या काळजाच्या तुकड्यांना गमावल्याचे दुःख सहन करणे कुटुंबीयांसाठी असह्य झाले होते. बगाटे यांच्यासमोर आपल्या भावनांना आवर घालणेही त्यांना शक्य झाले नाही. अश्रूंना वाट मोकळी करून देत कुटुंबीय कोसळले. त्या दुःखद क्षणी बगाटे यांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
कार्यालयीन औपचारिकतेच्या चौकटीत न अडकता, कोणालाही पूर्वकल्पना न देता स्वतः रुग्णालयात पोहोचून दुःखात बुडालेल्या कुटुंबीयांना धीर देण्याची त्यांची कृती लक्षवेधी ठरली आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मुलांना गमावलेल्या पालकांच्या अश्रूंना शब्दांनी थोपवता येत नसले, तरी अशा कठीण प्रसंगी त्यांच्या जवळ उभे राहणे हा माणुसकीचा मोठा आधार असतो. पोलिस अधीक्षक बगाटे यांनी आपल्या उपस्थितीतून तो आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्तव्य बजावताना कायद्याची कठोर अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्या वर्दीमागेही माणुसकीची भावना असते, याची जाणीव अशा प्रसंगांतून होते. संकटाच्या आणि दुःखाच्या क्षणी पीडित कुटुंबीयांपर्यंत स्वतः पोहोचून त्यांचे सांत्वन करणे, ही केवळ औपचारिक भेट न राहता माणुसकीच्या नात्याने दिलेला आधार ठरतो. बगाटे यांच्या या भेटीतून त्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडले आहे.
या दुर्दैवी घटनेने दोन कुटुंबांच्या आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा वेळी दुःखात सहभागी होणारा आणि धीर देणारा आधारही महत्त्वाचा असतो. अधिकारीपदाची खरी उंची केवळ निर्णयांतून किंवा कारवाईतून नव्हे, तर दुःखाच्या क्षणी सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहण्यातूनही दिसून येते. नितीन बगाटे यांच्या या कृतीतून वर्दीमागील संवेदनशील मनाचे दर्शन घडले. कर्तव्य बजावताना कठोर असणारा अधिकारी, दुसऱ्याच्या दुःखापुढे माणुसकीने उभा राहतो, तेव्हाच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू समोर येतो. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रुग्णालयात जाऊन केलेल्या सांत्वनामुळे पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेबरोबरच त्यामागील मानवी संवेदनाही या प्रसंगातून अधोरेखित झाल्या आहेत.