केवळ राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर नको: उदय सामंत
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक
रत्नागिरी:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत महायुती सरकार अत्यंत गंभीर व सकारात्मक असून, विद्यार्थ्यांना न्याय देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात मांडलेल्या भूमिकेबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, काही गोष्टी शक्य असतात तर काही अशक्य असतात, ही वस्तुस्थिती राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली आहे. मात्र, एमपीएससीच्या परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता असावी आणि परीक्षा कोणत्याही दबावाखाली होऊ नयेत, हा जो विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे तो रास्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या थेट राज्यपाल किंवा राष्ट्रपतींशी निगडित आहेत, त्याबाबत सरकार पुढील योग्य पावले उचलेल.
स्वामी विवेकानंदांप्रमाणे २३ वर्षांचा तरुण जर वाचनाच्या जोरावर राज्यातील विद्यार्थ्यांना एकत्र आणू शकत असेल तर त्याचे कौतुक झालेच पाहिजे, असे सांगत उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला विरोधी पक्षांना दिला. राजकारण करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर राजकारण होऊ नये ही महायुती सरकारची प्रामाणिक भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधक केवळ आंदोलनांच्या ठिकाणी जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून मतदारांना ते कधीही स्वीकारणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. दिल्लीतील काही नेत्यांच्या भूमिकेमुळेच अशा प्रकारची आंदोलने होत असल्याचे सांगत विरोधकांकडे अभ्यासाची कमी असल्यामुळे ते सभागृहात गप्प बसतात आणि बाहेर पडल्यावर आंदोलनांच्या गर्दीत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही त्यांनी केला.
विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. महायुती बहुतांश ठिकाणी एकत्र लढत असून पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, छगन भुजबळ यांच्या महामंडळांवरील निधीबाबतच्या वक्तव्यावर बोलताना सामंत म्हणाले की, महामंडळांच्या वाटपाबाबत भुजबळ स्वतः बैठकीला उपस्थित होते. येत्या महिनाभरात महामंडळांच्या अध्यक्षांची घोषणा केली जाईल आणि ती पुरेशा निधीसह केली जाईल, त्यामुळे भुजबळ यांचा काही गैरसमज झाला असल्यास तो दूर केला जाईल.
दरम्यान, रत्नागिरीसारख्या शहरात केंद्रीय विद्यालय सुरू झाल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले. या शिक्षण संस्थेमुळे रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षणाचे दालन उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.