सात्वीनगाव येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
खेड : तालुक्यातील सात्वीनगाव बोलेवाडी येथे एका ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शंकर बोले (वय ५१, रा. सात्वीनगाव, ता. खेड) यांनी त्यांच्या राहत्या घरी माळ्याच्या हुकाला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अन्वये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.