अंथरुणावरून खाली पडून वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील घटना
संगमेश्वर:
तालुक्यातील सोनवडे मधलीवाडी येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाचा अंथरुणावरून खाली पडून झालेल्या दुखापतीमुळे उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र गोविंद शिवगण (वय ७०, रा. सोनवडे मधलीवाडी, ता. संगमेश्वर) हे २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी अंथरुणावरून उठत असताना अचानक जमिनीवर खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी त्याच दिवशी सकाळी ९:३० वाजता रत्नागिरीच्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना, २६ सप्टेंबर रोजी रात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मयताचे पुत्र योगेश रामचंद्र शिवगण यांनी दिलेल्या खबरेवरून संबंधित पोलीस ठाण्यात बीएनएसएस १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्र. ४२/२०२६) करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.