संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुणाला अटक
चिपळूण कळंबस्ते येथील घटना
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे विठ्ठल मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरी किंवा अनुचित प्रकार करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या या इसमाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगेश लक्ष्मण गमरे (वय ४५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कळंबस्ते बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक भिकाजी रहाटे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण पोलिसांचे पथक २७ सप्टेंबरच्या रात्री गस्तीवर असताना, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौजे कळंबस्ते येथील विठ्ठल मंदिराजवळ एक व्यक्ती अंधारात संशयास्पदरीत्या स्वतःचे अस्तित्व लपवून उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
गस्तीवरील पोलिसांची चाहूल लागताच त्या इसमाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागीच पकडले. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वीच्या काळात अशा निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी थांबण्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. चोरीच्या उद्देशाने किंवा गुन्हा करण्याच्या इराद्याने तो त्या ठिकाणी दबा धरून बसल्याचे निष्पन्न झाल्याने, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२२ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.