बोटीवर स्वयंपाक करताना गॅसचा भडका
गंभीर भाजलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी : मासेमारी बोटीवर जेवण बनविताना गॅसचा अचानक भडका उडून गंभीर भाजलेल्या ४८ वर्षीय खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष कृष्णा फुटक यांच्यावर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर २२ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
संतोष कृष्णा फुटक (वय ४८, व्यवसाय बोट खलाशी, रा. चांदोर तळीवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी मासेमारी बोटीवर स्वयंपाकासाठी गॅस पेटवत होते. त्यावेळी अचानक गॅसचा भडका उडाला.
या दुर्घटनेत त्यांच्या चेहरा, हात आणि पायाला भाजल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मात्र १४ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.५० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत विलास कृष्णा फुटक यांनी दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ११७/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.