कागदपत्रांशिवाय संशयास्पदरित्या दुचाकी चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल
चिपळूणमधील वालोटी फाटा येथील घटना
चिपळूण :
चिपळूण तालुक्यातील खडपोली ते कळकवणे जाणाऱ्या रस्त्यावरील वालोटी फाटा येथे कोणतीही अधिकृत कागदपत्रे बाळगलेशिवाय संशयास्पदरित्या दुचाकी चालवणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास खडपोली ते कळकवणे जाणाऱ्या रोडवरील वालोटी फाटा येथे ही घटना घडली. फिर्यादी सुहास बापूराव साजूरे (वय ३२, पोलीस नाईक/३६७, नेमणूक- अलोरे शिरगाव पोलीस ठाणे) हे गस्तीवर असताना आरोपी संदीप राजेश कुमार (वय २३, रा. वरची खेडी मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी; मूळ रा. बेलाहर खुर्द, जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) हा त्याच्या ताब्यातील हिरो होंडा पॅशन प्रो दुचाकी (क्र. MH-08-S-0884) वरून जात असताना मिळून आला.
आरोपीकडे या दुचाकीच्या मालकी हक्काची कोणतीही अधिकृत कागदपत्रे जवळ नव्हती. सदरची दुचाकी त्याने कोणालातरी फसवून किंवा कुठूनतरी चोरून आणली असावी, असा संशय आल्याने फिर्यादीने या प्रकरणी कारवाई केली. या प्रकरणी २१ सप्टेंबर रोजी रात्री ८.४१ वाजता अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.