चहा पिऊन झोपलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी, ता. १७ : तालुक्यातील कशेळी-कोळंद येथे चहा पिऊन घरी बसल्यानंतर पुन्हा झोपलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत शंकर तांम्हणकर (वय ३९, रा. कशेळी कोळंद, ता. जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तांम्हणकर हे सकाळी चहा पिऊन घरी बसले होते. त्यानंतर काही वेळाने ते पुन्हा झोपले. दरम्यान, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचे नातेवाईक महेंद्र महादेव तांम्हणकर हे झोपेतून उठले. त्यावेळी प्रशांत यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रशांत यांना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तातडीने औषधोपचारासाठी पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशांत ताम्हणकर यांची तपासणी केली. उपचार सुरू असतानाच दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.