जिल्हा परिषदेच्या 1 हजार 350 शाळांना सीसीटीव्हीचे कवच
रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्यापक प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ३५७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपैकी आतापर्यंत १ हजार ३५० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बदलापूरसह राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांनंतर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दुर्गम व आदिवासी पाड्यांतील शाळांसह सर्व जि. प. शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २०२४-२५ या वर्षात ७०० शाळांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात २०२५-२६ या वर्षात आणखी ६५० शाळांमध्ये ४ कोटी रुपये खर्चुन सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील उर्वरित १ हजार १३ शाळांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिली आहे. सुरुवातीला निधीच्या अभावामुळे काही काळ हे काम संथ गतीने सुरू होते, मात्र आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला मोठा वेग मिळाला आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा २,३५७ आहेत. पहिला टप्पा (२०२४-२५) ७०० शाळांमध्ये कॅमेरे पूर्ण, दुसरा टप्पा (२०२५-२६) ६५० शाळांमध्ये कॅमेरे पूर्ण खर्च: ४ कोटी असून आता पर्यंत एकूण कॅमेरे बसवलेल्या शाळा १,३५० आहेत. अद्याप १,०१३ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
शहरांसोबतच ग्रामीण भागातील शाळांमध्येही सुरक्षिततेचे जाळे अधिक मजबूत होत असल्याने पालक आणि शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.