ट्रॅव्हलर संरक्षक कठड्यावर आदळून भीषण अपघात
दोन लहान मुलांसह १६ जण जखमी; चालकावर गुन्हा
राजापूर: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात गावी चाललेल्या कुटुंबाच्या अर्बानिया ट्रॅव्हलर गाडीला राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅव्हलर हॉटेल समोरील मोरीच्या संरक्षक कठड्यावर आदळून झालेल्या या अपघातात दोन लहान मुलांसह तब्बल १६ जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय सुनील यादव (वय ३०, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत नारायण देसाई (वय ४७, रा. डोंबिवली पश्चिम) यांनी कुशीनगर ट्रॅव्हलची अर्बानिया गाडी (क्रमांक DD 01 AG 9573) भाड्याने केली होती. या गाडीतून फिर्यादींचे कुटुंब आणि लहान मुलांसह १४ जण असा एकूण १४ जणांचा परिवार शनिवारी (दि. १२) रात्री सव्वा नऊ वाजता कुर्ला, मुंबई येथून गणेशोत्सवाकरिता मूळ गावी कुणकवळे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे जाण्यासाठी निघाला होता.
दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातिवले येथील हॉटेल अंकिता पॅलेस समोर आली असता, चालक अक्षय यादव याने गाडी भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी महामार्गावरील मोरीच्या संरक्षक कठड्यावर जाऊन धडकली.
या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून, चालक अक्षय यादव याच्यासह कुटुंबातील १६ जण जखमी झाले आहेत.
शशिकांत नारायण देसाई (४७), जान्हवी संतोष देसाई (२०), चिन्मय संतोष देसाई (१८), सखाराम महादेव देसाई (६८), राकेश सखाराम देसाई (३८), भक्ती उल्हास देसाई (२६), राजेश महादेव देसाई (३६), रुचा राजेश देसाई (३४), संतोष महादेव देसाई (५४), सुषमा सखाराम देसाई (६५), विनीता राकेश देसाई (३५), आराध्य राजेश देसाई (४), तीर्था राकेश देसाई (२), उर्मिला उल्हास देसाई (५२), स्नेहल संतोष देसाई (४५) आणि चालक अक्षय सुनील यादव (३०) अशी जखमींची नावे आहेत.
या प्रकरणी १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४ नुसार ट्रॅव्हलर चालक अक्षय यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल अधिक तपास करत आहेत.