गोवा बनावटीच्या दारूची विक्री; तिघांना अटक
राजापूरमधील घटना; ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
राजापूर: शहरात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करून विनापरवाना गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या आणि विक्रीसाठी आणलेल्या तिघा संशयितांना राजापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४१,३६६ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि मोबाईल संचासह एकूण ९१,३६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अक्षय अरविंद खटावकर (वय २९, रा. खडपेवाडी, राजापूर), विनीत नितीन भाबले (वय २०, सध्या रा. खडपेवाडी, राजापूर, मूळ रा. म्हाळुंगे, ता. राजापूर) आणि रोहित शिवाजी खानविलकर (वय २६, रा. खडपेवाडी, राजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रवीण प्रकाश चौगले यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० सप्टेंबर रोजी रात्री ७.४० वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी अक्षय खटावकर याच्या खडपेवाडी येथील घराच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत, भिंतीच्या आडोशाला व बांबूच्या बेटांमध्ये लपवून हा अवैध मद्यसाठा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी पहाटे ०२ वाजता गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली.
या कारवाईत ४१,३६६ रुपयांची गोवा बनावटीची दारू, ५०,००० रुपये किमतीचे ४ मोबाईल संच हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.