घराची कौले काढून घरगुती साहित्य लंपास
खेड
घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्याने छतावरील कौले काढून घरात प्रवेश केला आणि गॅस शेगडी, इस्त्री, मिक्सर, मिक्सरची भांडी तसेच स्टीलचे हंडे असा घरगुती साहित्याचा ऐवज लंपास केला. फुरूस-आमशेत येथे मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या घरफोडीत सुमारे सहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
याबाबत नाझिया परकार (वय ४४, रा. फुरूस-आमशेत, खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी चार ते रात्री ७.४० वाजण्याच्या दरम्यान घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने संधी साधली. छतावरील कौले काढून घरात प्रवेश केल्यानंतर त्याने घरातील वस्तूंची तपासणी करून विविध साहित्यावर हात साफ केला. चोरट्याने सुमारे दोन हजार रुपये किमतीची गॅस शेगडी, प्रत्येकी एक हजार रुपये किमतीची इस्त्री आणि मिक्सर, मिक्सरची स्टीलची दोन भांडी तसेच दोन स्टीलचे हंडे असा ऐवज चोरून नेला. घरातील नेहमीच्या वापरातील वस्तूही सुरक्षित नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नोंद घेतली असून, छतावरील कौले काढून घरात प्रवेश करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.