एसटी राबवणार मद्य व अंमली पदार्थ तपासणी अभियान
रत्नागिरी: लाखो चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या रत्नागिरी विभागासह राज्यभरातील एसटी चालकांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी मद्य व अंमली पदार्थ तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अभियानाची घोषणा केली असून, २०२६ ते २०२९ या कालावधीत ही व्यापक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व विभागांमधील चालक आणि वाहकांची नियमित व आकस्मिक तपासणी केली जाईल. रत्नागिरीसारख्या दुर्गम आणि वळणावळणाच्या महामार्गांवरून रोज हजारो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या एसटी चालकांच्या सुरक्षेला यामुळे मोठे बळ मिळणार आहे. अभियानाची प्रभावी सुरुवात करण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने परिवहन मंत्र्यांनी स्वतः १ लाख रुपयांची वैयक्तिक देणगी जाहीर केली असून, त्याद्वारे आधुनिक अंमली पदार्थ तपासणी यंत्रे खरेदी केली जाणार आहेत. या मोहिमेत केवळ एसटी महामंडळच नव्हे, तर खाजगी ट्रॅव्हल्स, शालेय बस, टॅक्सी, ऑटोरिक्षा, तसेच मालवाहतूक करणाऱ्या ट्रक व टँकर चालकांचाही समावेश केला जाणार आहे.
अंमली पदार्थांच्या प्राथमिक तपासणीसाठी एका विशेष डिजिटल किटचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाईल, ज्याद्वारे संशयित घटकांची तात्काळ छाननी करणे शक्य होणार आहे. कामावर रुजू होण्यापूर्वी कर्तव्यपूर्व तपासणी, अचानक केली जाणारी डिजिटल तपासणी आणि पारदर्शक प्रणालीमुळे नशेच्या प्रभावाखाली गाडी चालवण्यावर पूर्णपणे आळा बसेल. या अभियानामुळे रत्नागिरीतील स्थानिक नागरिक आणि विशेषतः मुंबई-कोकण प्रवासादरम्यान लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व निर्धोक होणार आहे.