बंद बंगल्याचे कुलूप तोडून २१ हजारांचा ऐवज लंपास
रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगरमध्ये बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. या घरफोडीत पितळ व तांब्याच्या भांड्यांसह बाथरूममधील मिक्सर, नळ, कपडे आणि इतर साहित्य असा एकूण २१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घरफोडी २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.२० वाजल्यापासून १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगरमधील ‘कृष्णकुंज’ बंगला बंद असल्याची संधी साधून चोरट्याने बंगल्याच्या समोरील दरवाजाचे कडी-कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला.फिर्यादी विनोद गणपत विचारे ( ६२, सध्या रा. डोंबिवली वेस्ट, मुंबई, मूळ रा. ‘कृष्णकुंज’ बंगला, खेडशी) यांनी याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बंद बंगला असल्याने काही दिवस घराकडे कोणी फिरकले नसावे. याचाच फायदा घेत चोरट्याने बंगल्यात प्रवेश करून घरातील मौल्यवान व वापरातील साहित्यावर डल्ला मारला.चोरट्याने घरातील एक चार्जिंग बॅटरी (२०० रुपये), पितळेची एक समई व सात मोठी भांडी (२ हजार रुपये), तीन तांब्याची भांडी, दोन ताम्हणे, एक पेला व एक पळीपात्र (९ हजार २०० रुपये), एक ॲल्युमिनियमचा डबा (५०० रुपये), बाथरूममधील दोन मिक्सर व तीन नळ (७ हजार रुपये) तसेच घरातील आठ साड्या (२ हजार ५०० रुपये) असा एकूण २१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेमुळे खेडशी परिसरातील बंद घरे व बंगल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घरमालक बाहेरगावी अथवा अन्य ठिकाणी राहत असल्यास त्यांच्या बंद घरांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी परिसरातील संशयित व्यक्ती, ये-जा करणारे तसेच चोरीच्या साहित्याच्या विक्रीबाबत तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.