वीकएंडला पावसाचा जोरदार कमबॅक; जोर कायम राहणार
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. काही ठिकाणी तुरळक पाऊस व्हायचा. त्यानंतर कडक उन्ह पडत होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली होती. मात्र रविवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला. रविवारी सकाळपासून पावसाच्या जोरदार सरींनी रत्नागिरीला झोडपून काढले. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी निराशा केली. अपेक्षापेक्षा तुलनेने कमी पाऊस झाला. त्यामुळे भात, नाचणी पिकांना धोका निर्माण झाला असून किटक, गोगलगायचा प्रार्दुभाव पडत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सप्टेंबर
महिन्यात पहिले दोन दिवस पावसाने दिलासा दिला. जिल्ह्याच्या अनेक भागात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. लांजा, रत्नागिरी, मंडणगड, खेड तालुक्यात पाऊस जास्त पडत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी 3 हजार 364 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी 2 हजार 730 मि.मी. पाऊस झाला होता.
रविवारी सकाळ पासून पावसाने आपला जोर पुन्हा वाढवला आहे. सकाळी दमदार हजेरी लावल्यानंतर दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारच्या सत्रात काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाने जोर केला. पुढील दोन दिवस पावसाची हजेरी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.