कृषी सेवा महासंघाचे ७ सप्टेंबरला धरणे आंदोलन
पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर राज्याभरातून अधिकारी-कर्मचारी धडकणार
मुंबई : राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या कृषी विभागाच्या अतांत्रिक आकृतीबंधाविरोधात महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रस्तावित आकृतीबंधाच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (दिनांक ०७ सप्टेंबर २०२६) रोजी पुण्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील (सेंट्रल बिल्डिंग) कृषी आयुक्तालयासमोर राज्यभरातून कृषी अधिकारी व कर्मचारी एकवटून तीव्र धरणे व लक्षवेधी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महासंघाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. सध्या राज्यात सुमारे २० हजार कृषी अधिकारी व कर्मचारी गाव-खेड्यांपर्यंत जाऊन कृषी विभागाचे कामकाज प्रत्यक्ष पार पाडतात. मात्र, या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या तांत्रिक अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासनातील अतांत्रिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा आकृतीबंध तयार करण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला आहे. या अतांत्रिक व अन्यायकारक आकृतीबंधास राज्यभरातील कृषी सेवा महासंघाच्या सर्व सभासदांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
या अन्यायकारक निर्णयाविरोधात कृषी कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले होते, तर ३ सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनस्तरावर यासंदर्भात वेळोवेळी चर्चा झाल्या असल्या, तरी त्यातून सकारात्मक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.
७ सप्टेंबरला पुण्यात राज्यव्यापी निदर्शने
आंदोलनाचा पुढील भाग म्हणून सोमवार, ०७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर (सेंट्रल बिल्डिंग) राज्यभरातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य धरणे आंदोलन व निदर्शने केली जाणार आहेत. या निदर्शनांद्वारे सरकारचे लक्ष वेधून मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब चापले व महासंघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.