पाडावेवाडी-मिरजोळे येथे बाळगोपाळांच्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा
रत्नागिरी :
रत्नागिरीतील पाडावेवाडी (मिरजोळे) येथे बाळ गोपाळांच्या उत्साहात दहीहंडीचा सण मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. श्रीकृष्ण जन्मोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी सोहळ्यात पाडावेवाडीतील लहान मुलांनी (गोविंदांनी) आपल्या कौशल्याच्या जोरावर दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.
सकाळपासूनच मिरजोळे पाडावेवाडी परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत होते. आकर्षक सजावट आणि ‘गोविंदा आला रे आला’, ‘ यांसारख्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बाळ गोपाळांनी एकापेक्षा एक वरचढ थर लावत उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली. लहान मुलांचा उत्साह पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा यथोचित गौरव केला.
या प्रसंगी पाडावेवाडीतील स्थानिक नागरिक, ज्येष्ठ मंडळी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. लहान मुलांच्या सुरक्षिततेची योग्य ती दक्षता घेऊन या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी फुटल्यानंतर उपस्थितांमध्ये प्रसाद वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक युवक आणि बाळ गोपाळ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.