रत्नागिरी आणि चिपळूण स्टेशन ते बस स्टँड शटल बस सेवा सुरू करा; ग्राहक पंचायतीची मागणी
खाजगी वाहतूकदारांची मनमानी रोखा
रत्नागिरी– गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने खाजगी वाहतूक करणारे वाढीव दर लावून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी येत असतात.
या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत रत्नागिरी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि विभाग नियंत्रक एस टी महामंडळ यांची भेट घेऊन प्रवासी ग्राहकांसाठी प्रवासाची सुविधा रास्त दराने उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
एस टी महामंडळ विभाग नियंत्रक श्री जानकर यांच्या सोबत या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा करण्यात आली असून रेल्वे स्थानकावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे तत्वतः मान्य करण्यात आले आहे. या शिवाय प्रवाशांना रात्री अपरात्री रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर होणाऱ्या प्रवासाच्या अनुपलब्धतेच्या दृष्टीने गणेशोत्सव कालावधीमध्ये सतत शटल बस सेवा सुरू करण्यासाठी बसेस, मनुष्यबळ यांच्या उपलब्धतेचा विचार करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड अशी २४ तास सिटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन विभाग नियंत्रक श्री जानकर यांनी दिले आहे.
या वेळी ग्राहक पंचायत रत्नागिरी चे अध्यक्ष संजय वैशंपायन आणि राजू भाटलेकर यांनी प्रवाशांच्या वतीने आग्रही भूमिका मांडली आहे.