नाचणे लिंक रोडवर चुकीच्या दिशेने वाहन चालवित अपघात; गुन्हा दाखल
रत्नागिरी, : रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे एका रेस्टॉरंटच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी (ता.२३) रात्री दहाच्या सुमारास घडली. या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २७) अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजता संदीप लक्ष्मण भारते (वय ३२, रा. तांबळवाडी, देवळख ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ०८ एआर ०१५९) घेऊन कोल्हापूर ते रत्नागिरी शहर मुख्य रस्त्याने प्रवास करत होते. संदीप भारते हे साळवी स्टॉप येथील एका रेस्टॉरंटच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावरून रत्नागिरी शहर ते नाचणे लिंक रोडच्या दिशेने जात असताना समोरून एक अज्ञात दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत येत होता. रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीची विशिष्ट स्थिती लक्षात न घेता तसेच आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने निष्काळजीपणे चालविल्याने त्याने संदीप भारते यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत संदीप भारते यांना किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर संबंधित अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेला असून त्याचे नाव व गाव पोलिसांना अद्याप समजू शकलेले नाही.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित रमाकांत जाधव यांनी तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.