मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे व दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेची आंतरराष्ट्रीय भरारी
वर्ल्ड स्कूल समिट २०२६ साठी नामांकन; ‘बेस्ट स्कूल-ग्रामीण भाग’ आणि ‘बेस्ट मॅनेजमेंट-ग्रामीण भाग’च्या दोन श्रेणींमध्ये नामंकने
रत्नागिरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत शैक्षणिक, कला, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे व दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा आंतरराष्ट्रीय तुरा खोवला गेला आहे. मलेशियातील Asia Pacific University of Technology & Innovation (APU), Kuala Lumpur येथे २६ सप्टेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या ४१व्या World School Summit 2026 साठी दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेची दोन नामांकनासाठी निवड झाली आहे.
जगभरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळांना या आंतरराष्ट्रीय समिटसाठी नामांकन देण्यात येते. यासाठी विविध देशांतील शाळांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. शाळेची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांतील कामगिरी, कला व क्रीडा क्षेत्रातील योगदान, तसेच संस्था व शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा विचार करून नामांकन प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेत मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडेचे विद्यमान सचिव तसेच दि मॉडेल इंग्लिश स्कूलचे विद्यमान क्लर्क श्री. रुमान मकबूल पारेख यांनी प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने ऑनलाइन नोंदणी करून नामांकनासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर World School Summit च्या आयोजकांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत ई-मेलद्वारे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेची या आंतरराष्ट्रीय समिटसाठी दोन नामांकनासाठी निवड झाल्याचे कळविण्यात आले.
विशेष म्हणजे, या समिटमध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे आणि मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे यांना ‘Best School in Rural Area’ आणि ‘Best Management in Rural Area’ या दोन महत्त्वपूर्ण श्रेणींमध्ये नामांकने मिळाळी आहेत.
ग्रामीण भागातील एका शाळेला मिळालेले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकन निश्चितच सैतवडे गावासाठी, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीसाठी, शाळेसाठी, विद्यार्थी-पालकांसाठी तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे आणि मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे नाव आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठावर पोहोचले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटी व दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे यांच्यावर अध्यक्ष श्री. रहीम हसन माद्रे, सचिव श्री. रुमान मकबूल पारेख, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली ही भरारी म्हणजे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीला मिळालेली एक महत्त्वपूर्ण पावतीच मानली जात आहे.