रत्नागिरी कारागृहातील कैद्याचा मृत्यू
दम्याचा त्रास व अशक्तपणामुळे रुग्णालयात उपचार
रत्नागिरी, : रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून असलेल्या ६५ वर्षीय कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक गौराजी गमरे (वय ६५, रा. कळकवणे, बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे मृत बंदीचे नाव आहे. त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गमरे हे रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून होते. कारागृहात असताना त्यांना अस्थमा (दमा) तसेच अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता पोलीस पथकाच्या सुरक्षेत दीपक गमरे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मेडिसीन विभागाच्या कक्षेत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत होते.
मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती हळूहळू अधिक खालावत गेली. वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असतानाही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. जिज्ञासा भाटे यांनी दीपक गमरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. गमरे हे न्यायाधीन बंदी असल्याने त्यांच्या मृत्यूची नोंद करून प्रशासकीय तसेच कायदेशीर नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण, तसेच या प्रकरणातील आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया संबंधित यंत्रणेकडून पूर्ण केली जात आहे.